Monday 4 May 2020

आंबेडकरी चळवळीच्या निळ्या नभातले धम्मसेनापती ! जी एस दादा कांबळे !

आंबेडकरी चळवळीच्या निळ्या नभातले धम्मसेनापती ! जी एस दादा कांबळे ! 
                              आनंद दिवाकर चक्रनारायण 
                                   मो 7058630366

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा आपण अभ्यास करायचा ठरविला तर सर्वात आधी आपण बाबासाहेबांच्या जातीय वंशाचे लोक गोळा करायला लागतो ! आणि या जातीय गोतावळयात आपण अनाहूतपणे बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी जातीविहिन समाजरचना (decaste society ) या संकल्पनेला जाणीवपूर्वक हरताळ फासतो ! केवळ बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आलं म्हणजे आंबेडकरवादी आणि ईतर वेगळे असं समीकरण मांडणारे आपण कोण ? बाबासाहेबांच्या एकूणच सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक सांस्क्रुतिक चळवळीचा मागोवा घेतला असता आपल्या अशी लक्षात येईल कि बाबासाहेबांना साथ देणारे हे समाजातील सर्वच स्तरातील लोक होते ! चांद्रसेन कायस्थ प्रभू , सारस्वत ब्राम्हण , आगरी , भंडारी , कुणबी , चर्मकार , मराठा , मातंग , !  
      या सर्वच यादीमध्ये आपल्याला स्म्रुतिशेष जी एस दादा कांबळे यांचे नाव आदरपूर्वक आणि अग्रक्रमाने घ्यावे लागेल ! आज 27 मार्च 2020 ! जी एस दादांचा प्रथम स्म्रुतिदिन ! दादा अचानकच आपल्यातून निघून गेले ! हृदयविकारांचा तीव्र झटका त्यांचे जीवन आणि त्यांचा श्वास थांबवू शकला नाही ! काही समजण्याच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली ! चळवळीतील एक व्यक्ती जाणं म्हणजे चळवळीचा फार मोठा घात असतो ! एक व्यक्ती म्हणजे ति एक चळवळ असते ! जी एस दादा हि सुद्धा एक लोकचळवळच होती ! 
    डोक्यावर अर्ध टक्कल पडलेला , अंगात साधारण ड्रेस , गळ्यात पँथर राजाभाऊ ढालेसारखी  शबनम , खांद्यावर प्रा जोगेन्द्र कवाडे सरांसारखी शाल , आणि एका हातात पुर्वीचे लहूशक्ती आणि आताचे  तथागत मासिक तर दुसऱ्या हातात कार्यक्रमाचे पेम्प्लेट ! कुठेही भेटले तरी न हिचकता जोरात" जय भीम" म्हणणार ! मग ते शासकीय कार्यालय असो वा प्रोझोन मॉल ! एकदम स्वाभिमानी ! 
  2005 साली संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशभरात बौद्ध धम्म स्वीकाराची चळवळ जोरदार सुरू असताना जी एस दादा फक्त या चळवळीकडे एक कटाक्ष टाकून बघत होते ! पण ते त्यावेळेस त्या चळवळीत सामील झाले नाहीत! आम्ही त्यांना नेहमी म्हणायचो , "दादा आपण का धर्मांतर करीत नाहीत"त्यावर दादा गालातल्या गालात स्मित हास्य करायचे आणि आम्हाला उत्तर द्यायचे "सम्राट आमचे आता कुठे काम सुरू झाले आहे ! मातंग समाजाला धर्म आहे काय ? आम्हाला यांचे आधी प्रबोधन करावे लागेल ! ह्यांच्या घरातील देव्हारे अंगारे धुपारे ह्यांच्या मनातून अन मेंदूतून बाहेर काढावे लागतील ! ह्यांच्यातला पोतराज आणि मरिआई आम्हाला भिक्खू भीक्खुणी बनवावी लागेल ! ह्यांनी धम्माची बाराखडी शिकवावी लागेल ! पीतवस्त्र नव्हे काषाय वस्त्र हे साधूचे नसून भन्तेचे आहे हे ह्यांच्या मनात ठसवावे लागेल !जेव्हा हे मनाने आणि बुद्धीने परिपक्व होतील तेव्हाच ह्यांना घेऊन धम्मदीक्षा घेईल !" पुढे आम्ही विचारलं कि,"तुमच्या धम्मदिक्षेच काय!"त्यावर दादा म्हणत "मला धम्मदीक्षा घेण्याची काही आवश्यकता नाही ! कारण आचरणाने आणि विचाराने मि बौध्दच आहे ! मि पंचशील पाळतो ! 22 प्रतिज्ञा पाळतो ! बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग अवलम्बतो !मी बौद्ध आहे हे कुणाला सांगण्याचा कार्यक्रम नाही !"तेव्हापासून जी एस दादा यांनी  "मातंग समाजाला धर्म आहे काय ?"हा उपक्रम हाती घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला ! आणि महाराष्ट्रभरातील मातंग समाजाला तसेच हैदराबाद तेलंगणा प्रांतातील माला मादीगा आदी समाजाला एकत्र करून त्यांच्यात बुद्ध धम्म संघ पेरण्याचे महत्तम कार्य केले ! 2004 ते 2014 अशी एकूण 10 वर्षे जी एस दादांनी समाज पेरणी केली ! आणि 6 सप्टेंबर  2014 ला कराळी ता उमरगा जी लातूर येथे काहि निवडक कार्यकर्त्यासोबत कुठलाही धम्मदिक्षेचा गाजावाजा न करता  जी एस दादा कांबळे यांनी पूज्य भन्ते धम्मडीप बोधगया यांच्याहस्ते धम्मदीक्षा ग्रहण केली !तेव्हापासून धम्मदीक्षा कार्यक्रमांना गती लाभली ! गावोगावी धम्मदीक्षा सोहळे यशस्वी होवू लागले !  पुन्हा 13  जानेवारी 2019 रोजी डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ज्ञानभूमीत मिलिंद महाविद्यालय सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहात  नागसेनवन औरंगाबादेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद पोचीराम कांबळे यांच्या कुटुंबीयांसमवेत मासिक तथागत चे कार्यकारी संपादक अरुण कांबळे शिन्दिकर यांच्या सह हजारो मातंग बांधवांच्या सोबत पूज्य भदन्त आर्य नागार्जुन सूरई ससाई यांच्या हस्ते आणि लॉंग मार्च प्रणेते प्रा जोगेन्द्र कवाडे सर यांच्या उपस्थितीत  धम्मदीक्षा सोहळा यशस्वी केला ! आणि अवघ्या 66 दिवसांनी जी एस दादा आपल्याला सोडून गेले ! या धम्मदीक्षा पर्वातला जिजा एकनाथ आव्हाड , हनुमंत उपरे काका , यांच्यानंतरचा एक दुवा जी एस दादांच्या रूपाने पुन्हा एकदा अस्त पावला ! पण जी एस दादा जरी शरीररूपाने गेले तरि त्यांचे कार्य आपल्या तनमनात आहेच की ! दादांचे लेखन , दादांची भाषणे , दादांचा सहवास , दादांचा गोतावळा हे सर्वच पुढे नेण्यास सक्षम आहे ! दादा आयुष्यभर प्रबुद्ध राहिले , जगले,  वागले ! आज दादांची उणीवा भासत आहे ! आता त्यांचा फोन येणार नाही , ना , एस एम एस ना व्हाट्स अप ! न फेसबुकवर एखादी पोस्ट वा त्यांनी स्वतः अपलोड केलेला फोटो ! दादा ! आंबेडकरी चळवळीतल्या निळ्या नभात आपण हजारो वर्षासाठी अजरामर झालात ! आपण आंबेडकरी धम्मचळवळीचे धम्मसेनापती झालात ! आपल्या प्रथम स्म्रुतिदिनी विनम्र अभिवादन !                             आनंद दिवाकर चक्रनारायण मो 7058630366