अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची पांडबा व्याकुळतेने वाट पाहत होता कारण आज पांडबा आपल्या 14 वर्षाच्या जन्मठेपेतुन मुक्त होणार होता. सवर्णांच्या अत्याचाराला वैतागुन पांडबाच्या हातून नकळत एका जुलूमी पाटलाचा खून झाला होता, ज्याचा पश्चाताप पांडबा गेली 14 वर्षे जेलमधे करत होता.
पांडबा येरवडा जेलच्या गेटमधुन बाहेर आला तर पाहतो काय त्याचा तरुण मुलगा हातात हार घेऊन भली मोठी BMW कार घेऊन आपल्या बापाचे स्वागत करायला उभा होता.. मग मुलगा म्हणाला की "या बाबा बसा गाडीत" हे सर्व पाहुन पांडबाचा आनंद गगनात मावेना, पण अचानक पांडबाचं लक्ष गेल ते त्या BMW गाडीच्या काचेवर तिथे लिहिले होते "ॐ साई राम" ... पांडबाच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो म्हणाला की या गाडीवर बाबासाहेबांचे नाव नाही पण हे "ॐ साई राम" कुठून आलं?
मुलाने कशी बशी समजूत काढली मग पुढे बापलेकांचा प्रवास मुम्बईच्या दिशेने सुरु झाला...
मुंबईजवळ आल्यावर पांडबाला त्याचे बालपण जिथे गेले ते "भीम नगर" दिसले
पांडबा : (मुलाला) अशोक गाडी थांबव
अशोक : बाबा आता आपण इथे राहत नाही आता आपण हीरानंदानी मधे राहतो हां झोपड़पट्टी एरिया आहे काय करायचे तिथे जाऊन... सर्व ब्लडी डर्टी जयभिमवाले लोक राहतात तिथे
पांडबा आश्चर्याने अशोककड़े पाहू लागला ...
गाडी शेवटी हीरानंदानी काम्प्लेक्स मधे शिरली, मग 17व्या माळ्यावर लिफ्टने गेल्यावर दारावर "अशोक पांडबा कांबळे" च्या ऐवजी "Ashok P.K." एवढेच होते.
आत शिरल्यावर पांडबा घरात बुद्ध बाबासाहेब यांचे फ़ोटो शोधत होता पण त्याला काही काही सापड़ेना आणी समोरच त्याला भला मोठा गजानन महाराजाचा गांजा ओढ़तानाचा फ़ोटो सोन्याच्या फ्रेम मधे सजवलेला दिसून आला..
आता तर पांडबाला राग अनावर झाला
पांडबा : आरं लेका! हे समदं काय पाहतोय मी, तुझ्या दारावर गाडीवर कुठच बाबासाहेब नाही आन इथ घरातपण ह्या लंगोटीवाल्या चिल्लमतोंडयाचा फोटु तू लावलायस तुला मह्या सूटबूट वाल्या बाबासाहिबाचा फोटु लावाय कसली लाज वाटत व्हती रं?
अशोक : बाबा just try to understand my feelings इथे सर्व पॉश लोक राहतात इथे हे जयभिम वगैरे चालत नाही...
पांडबा : आरं मग ह्यो लंगोटवाला चिल्लमतोंडया चालतोय व्हय?
आरं नालायक अवलाद ... ज्या मह्या भीमामूळं तुला हे समदं वैभव मिळालं त्या आपल्या बापाला तू इसरलास यापेक्षा काय वाइट बघायचं व्हतं जीवनात? आरं कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट गत होती आपली त्या बाबासाहेबानं आपल्याला हे मिळवून दिलं त्या बाबासाहेबा सोबत मी स्वतः महाड़च्या आंदोलनात व्हतो, नागपुरच्या दीक्षाभूमित व्हतो आम्ही कधी कुठल्या देवाला भिक नाय घातली कष्टाचा घाम गाळून तुला तुह्या मायनं मोठा केला आन तू त्या बाबासहेबाला इसरलास?
अशोक : अहो बाबा आपण असे किती दिवस जयभिम जयभिम घेऊन बसायचे? मला जे काही मिळाले ते तुमच्यामुळे मिळाले आईमुळे मिळाले जर तुम्ही कष्ट नसते केले तर मी आज डॉक्टर झालो नसतो त्यात मी मग बाबासाहेबांना का मानु?
पांडबा : आरं कष्ट तर मह्या आईबापानं पण मह्यासाठी लइ केलत पण म्या का नाही तुह्यासारखा डॉक्टर बनलो? कारण तूमच्या टाइमाला बाबासाहेबानं तुमच्या साठी समदं करून ठिवलं व्हतं ... आरं त्या माउलीन तुह्या मायेनं तुला शिकता यावं म्हणून लोकांच्या घरात धूनी भांडीची कामं केली पण कधी तिनं भीम आणी बुद्ध सोडून कुणा देवापुढं हात जोड़लं नाही...
अशोक : बस बाबा enough is enough मला तीच तीच तुमची जुनि कैसेट ऐकवू नका ... लक्षात ठेवा माझ्या पत्नीला आणी मुलांना देखील हे जयभिम जयभिम आवडत नाही (तितक्यात अशोकचा मुलगा जिम्मी शाळेतून येतो)
जिम्मी : हाय ग्रँडपा! How are You? तुम्ही का भांडत आहात?
पांडबा : आरं तुह्या बापानं बाबासाहेबाचा फोटु घरात लावला न्हाई,
जिम्मी : Who is this बाबासाहेब? Ohhh I am extremely sorry, I am not sure but I think त्यांनी काही संविधान वगैरे लिहिले असे ऐकले आहे पण त्यामुळे त्यांचा फ़ोटो इथे का लावायचा?
पांडबाच्या शरीराचे तर आता रक्तच आटले होते त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहु लागल्या होत्या त्याचाच मुलगा बाबासाहेबाना विसरला होता या विचाराने तो कोलमडून गेला होता.. आपलं गाठोडं घेऊन पांडबा एक एक जड़ पाऊल दाराकडे टाकू लागला...
अशोक : (चिडून) कुठे चाललात? वृद्धश्रमात? मला माहीत होतं की तुम्ही या घरात बाबासाहेबांच्या फ़ोटोवरुन तमाशा करुन इथून रागाने निघुन जाल!
पांडबा : वृद्धाश्रम हे तुह्यासाठी उपयोगी आहेत मह्यासाठी नाही, म्या चळवळीतला भीमसैनिक हाय, म्या मह्य आयुष्य मह्या भिमाच्या चळवळीत समर्पित करेन पण जिथं तू बाबासाहेबाला इसरलास तिथं तुझा लेक पण तुला इसरल्याबगीर राहणार नाही...
पण एक लक्षात ठीव जवा तुझा पोरगा तुला घरातनं हाकलल तेव्हा तू जा त्या वृद्धाश्रमात... तुला नक्की गरज पडेल...
🙏🏻
धन्यवाद
लेखक:
जगदीश संदानशिव
कल्याण.
सादर:
प्रशांत जाधव
कल्याण.