Chandrasekhar Azad praises Ambedkar statue in Pune | चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यातील आंबेडकर पुतळ्याला केलं अभिवादन
चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यातील आंबेडकर पुतळ्याला केलं अभिवादन
पुणे : मुंबईवरून पुण्याकडे निघालेल्या चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यात आल्यानंतर प्रथम त्यांनी शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रशेखर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हेंच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

चंद्रशेखर आझाद हे मुंबईतील वरळीमध्ये सभा घेणार होते. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. तसेच ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या पाचशे मीटर अंतरावर जमावबंदी लागू करण्यात आली होती. सरकारने आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचा आरोप आझाद यांनी केला होता. आज संध्याकाळी पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर त्यांची सभा होणार होती, त्याची तयारी सुद्धा करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने त्यांची सभा रद्द करण्यात आली.

तसेच उद्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सभा घेणार होते. त्या सभेला देखील विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे. आझाद यांना मुंबईतून उत्तर प्रदेशला पाठविण्यात येईल, असे सांगितले जात होते. परंतु दुपारी 1.30 च्या सुमारास आझाद हे मुंबईवरून पुण्याला येण्यासाठी निघाले. रात्री 9.30 च्या सुमारास पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याजवळ ते दाखल झाले. दरम्यान,आझाद हे आज पुण्यात थांबून 1 तारखेला कोरेगाव भीमा येथे जाण्याची शक्यता आहे.