Monday, 31 December 2018

💥 *वंदे मातरम् काराचे झणझणीत अंजन*

 *वंदे मातरम् काराचे झणझणीत अंजन*
'वंदे मातरम्' कार बंकिमचंद्र चटर्जी यांचा एका लेखातील एक खळबळजनक उतारा *जनतेत* (जनता वृत्तपत्र, २२ फेब्रुवारी १९२९) आढळतो.
      बकिमचंद्रांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, *मूठभर ब्राम्हण-क्षत्रियांनी बहुजन समाजावर अन्यायकारक पद्धतीने राज्य केले.* जसा विदेशी ब्रिटिशांनी भारतीयात भेदभाव केला तसेच स्वदेशी ब्राम्हणांनी बहुसंख्य भारतीयांशी भेदभावाचे धोरण ठेवले. *इंग्रजशाही आणि ब्राम्हणशाहीची* तुलना करताना बकिमचंद्र लिहितात;
         "काही लोक म्हणतील की इंग्रजांच्या प्राधान्यात आणि ब्राम्हण क्षत्रियांच्या वरचढपणात मोठा फरक आहे. ब्राम्हण कितीही झाले तरी स्वदेशीय होते व आहेत. इंग्रज बोलून चालून परकीय! यास आमचे असे उत्तर आहे की, *स्वदेश बांधवांपासून होणाऱ्या पीडेत व अन्यायात काही फरक अाहे का?* एकाच्या हातून होणारी पीडा कडू असते आणि दुसऱ्याच्या हातून होणारा त्रास गोड तर नसतो ना? *त्रास तो त्रास. पीडा ती पीडा.* कदाचित काही लोकांस परकीय लोकांकडून होणारा त्रास स्वकीयांपासून झालेल्या त्रासापेक्षा बरा वाटत असेल. त्यांच्याशी आम्हांस काही कर्तव्य नाही. आम्ही एवढेच म्हणतो की, *बहुसंख्यांक भारतीयांच्या दृष्टीने इंग्रजशाहीत होणाऱ्या त्रासापेक्षा ब्राम्हणशाहीत झालेला व होणारा त्रास आणि अधिक अपमान आहे.*
          हिंदी लोकांची *इंग्रज नोकरशाही* विरुध्द एक जोराची तक्रार असते. ती ही की लायक हिंदी मनुष्य असला तरी त्याला जबाबदारीच्या उच्च नोकऱ्या मिळत नाहीत. हिंदी लोकांस आपल्या गुणांचा विकास करावयास संधी किंवा अवसर मिळत नाही. त्यास *Equality of Opportunity (समान संधी)* मिळत नाही. परंतु ही तक्रार करणाऱ्यांनी हिंदुस्थानच्या मागील इतिहासाकडे दृष्टी फेकली तर त्यास आढळून येईल की, *त्यांच्या ब्राम्हण क्षत्रिय पूर्वजांनी इंग्रज नोकरशाहीपेक्षाही कमालीचा मोठा अन्याय शूद्रवर्गात ढकलेल्या, मागासलेल्या व अस्पृश्य वर्गाच्या बाबतीत केलेला आहे.* इंग्रजांनी आमच्या काही गोष्टी हिरावून नेल्या असल्या तरी त्यांनी आम्हांस पाश्चात्य साहित्य व विज्ञान याचे ज्ञान दिलेले आहे. बहुसंख्याक शूद्र ठरविलेल्या जनतेस आमच्या पूर्वजांनी मोबदल्यात काहीच दिले नाही. ब्राम्हण व त्याच्या खालोखाल क्षत्रियांना सौख्य व अधिकार होते. परंतु प्रचंड लोकसमूहाची स्थिती हल्ली आहे तशीच होती. काही इतिहासाचे मते ती हल्लीपेक्षाही निकृष्ट होती. खालच्या लोकांस काही अधिकार नसत. त्यांच्या करिता निराळे कायदे असत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची फिर्याद नसे. एवंच त्यांस *सर्वस्वी अन्यायाच्या व दुःखाच्या गर्तेत लोटून दिलेले होते."*
          'वंदे मातरम्' च्या आडून मुस्लिमांवर तिरंदाजी करणाऱ्या *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपाच्या नेत्यांच्या* डोळ्यात बकिमचंद्रांचे हे *झणझणीत अंजन* अजूनपर्यंत कोणी घातले नसावे. अन्यथा 'वंदे मातरम्' च्या नावाखाली अष्टभूजाधारी देवीची पूजा अर्चना करण्याचे सोंग उभे करावयाचे, अन्य धर्मियांना *भडकावयाचे* पण भारताची बहुसंख्यांक जनता - खरी भारतमाता यांना मात्र *गुलामीत* ठेवण्याच्या *षडयंत्रांना* कुठे तरी गवसणी घातली गेली असती......

No comments:

Post a Comment