Monday, 31 December 2018

सर्वांसाठी_बाबासाहेब

१९३७ साली मुंबई विधानसभेवर काँग्रेसला बहुमत मिळाल्याने त्यांचे मंत्रिमंडळ बनविण्यात आले. ना.बाळासाहेब खेर हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. मुस्लिम लीगचे सदस्य आमच्यापेक्षा अधिक होते. लीगनंतरचा मोठा विरोधी पक्ष म्हणजे आमचाच होता. (स्वतंत्र मजूर पक्ष) विरोधी पक्षात त्यावेळी जमनादास मेथा यांच्यासारखे प्रभावी वक्ते असल्यामुळे विरोधी सत्तांचा सत्तारूढ सरकारवर फार दबाव होता. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, सर देहलवी व जमनादास मेथा हे बोलायला उठले म्हणजे सगळे सभागृह एकदम शांत व्हायचे. सत्तारूढ काँग्रेस पक्षातील सदस्य त्यावेळी कावरेबावरे व्हायचे. 
         बाबासाहेबांचे भाषण मुद्देसूद, प्रमाणबद्ध, प्रभावी व परिणामकारक असे व्हायचे. ते अंत:करणाला जाऊन भिडायचे. पुरावे आणि आकडेवारी यांच्या साहाय्याने प्रतिपक्षालाही आपले म्हणणे पटवून द्यायचे. सरकारी बाकावरील काहीतरी थातूरमातूर आणि जुजबी स्वरूपाची उत्तरे देत. त्यावेळी विरोधी पक्षांतून त्यांची हुर्रे करण्यात येत असे. बाबासाहेबांचे भाषण असलेल्या दिवशी सभागृह भरगच्च भरलेले असायचे. प्रेक्षकांच्या गॅलरीतही गर्दी व्हायची. बाबासाहेबांचे प्रतिपादन केवळ विरोधासाठी विरोध अशा प्रकारचे नव्हते. तात्विक निकषांवर ते विवेचन करायचे. तत्वतः बाबासाहेबांचे विवेचन मान्य आहे अशा प्रकारची कबुली त्यावेळचे मुख्यमंत्री ना.बाळासाहेब खेर अनेकदा देत असत. मुख्यमंत्री श्री.खेर यांच्या मनात बाबासाहेबांच्याबद्दल एक प्रकारची आदराची भावना वसत होती.

डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून

#सर्वांसाठी_बाबासाहेब

No comments:

Post a Comment