Sunday, 23 December 2018

💥 एक प्रसंग (१९३६) चिकोडीची (कर्नाटक) सभा (निवडणूक प्रचारासाठी)

चिकोडीची (कर्नाटक) सभा (निवडणूक प्रचारासाठी) रात्री सुमारे बारा वाजता सुरु करण्यात आली. दिवसभराच्या परिश्रमामुळे, दगदगीमुळे बाबासाहेबांच्या प्रकृतीवर बराच ताण पडला होता. बाबासाहेबांना त्या सभेत उठून उभे राहणे अशक्य झाले. त्यामुळे चिकोडीची सभा त्यावेळी रद्द करून ती दुसऱ्या दिवशी सकाळी घेतली. त्या रात्री चिकोडीतच बाबासाहेबांनी मुक्काम केला. तेथील डाक बंगल्यात त्यांची राहण्याची सोय केली होती. त्या दिवशी बाबासाहेबांना फारच त्रास झाला होता. पक्ष किंवा समाजाचे कार्य स्वतःच्या शरीरापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे सतत १८ तास त्यांचा दौरा चालला होता. डाक बंगल्यात गेल्यानंतर बाबासाहेबांनी तेथील एका भिंतीवर डोके ठेवून भिंतीला लागून बराच वेळ उभे राहिले होते. बाबासाहेबांना झालेला हा त्रास पाहून तेथे असलेल्या आम्हां मंडळींना फार वाईट वाटले व आम्ही बाबासाहेबांना त्रास देत असल्याबद्दल आम्हांलाही पश्चात्ताप झाला.
        आम्ही दोघातिघांनी बाबासाहेबांना धरून टेबलाजवळ नेले. त्या दिवसाच्या परिश्रमामुळे त्यांचे खाण्यावर देखील लक्ष नव्हते. आम्ही आग्रह करून त्यावेळी थोडे खायला लावले. थोडे दूध प्यायला दिले. नंतर त्यांना तसेच अंथरूणावर झोपवले. समाजाचे कार्य करता आपले काय होईल, याचा ते कधीही विचार करीत नसत. शरीराला कितीही त्रास पडला, प्रसंगी उपास काढावा लागला तर कोणाजवळही त्याबद्दल ते अवाक्षरही बोलत नसत. बाबासाहेबांनी संपूर्णतया आपले तनमनधन समाजकार्याला वाहून घेतले होते.

डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून

No comments:

Post a Comment