Monday, 31 December 2018

⛩ कामठी परिषद 👩‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦‍👦 ( मे १९३० कामठी, नागपूर परिषदेमधील एक प्रसंग)

⛩ कामठी परिषद 👩‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦‍👦
( मे १९३० कामठी, नागपूर परिषदेमधील एक प्रसंग)

परिषदेच्या पहिल्या दिवशी जेवणाच्या पंगती सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बसत होत्या, दुपारचे दोन वाजले होते. बाबासाहेबांनी मला विचारले, 'अरे तुम्ही जेवलात का?' मी त्यांना सांगितले, 'अजून आमचे जेवण झालेले नाही. आम्ही आता कुठून तरी जेवण करुन येतो.' असे म्हणताच बाबासाहेब एकदम माझ्यावर रागवले. (प्रेममूलक राग) ते म्हणाले, "इतके हजारो लोक येथे जेवत असताना तुम्ही देखील तेथे जाऊन जेवायला काय होते?" मी बाबासाहेबांना सांगितले, "बाहेरून आलेल्या खेड्यातील लोकांची येथे बरीच गर्दी झालेली असल्याने त्यांची प्रथमतः सोय होणे अत्यंत महत्वाचे आहे. या दृष्टीने आम्ही थोडीशी हयगय केली."
         बाबासाहेबांनी ताबडतोब श्री.शिवतरकर व मडकेबुवा यांना बोलावून घेतले व त्यांना म्हणाले, "तुम्ही लोकं स्वतःपुरतेच बघता. तुमच्याबरोबर आलेल्या इतर मंडळीची देखील विचारपूस करणे हे तुमचे काम नाही का?" असे म्हणून आमच्याकडे ते निर्देश करुन म्हणाले, "वराळे व होंगल हे कर्नाटकातून आले आहेत. येथे त्यांची विशेष कोणाशी ओळखपाळख नाही. ते अजूनही जेवले नाहीत. तेव्हा ताबडतोब त्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे." असे म्हणून त्यांनी आपल्या खिशातील दहा रुपयांची नोट काढून श्री.मडकेबुवा यांच्याकडे दिली व ताबडतोब बटाटे, वांगी, डाळ, तांदूळ वगैरे आणावयास लावले व जवळच एका राहुटीमध्ये स्वतःच्या देखरेखीखाली मडकेबुवांच्याकडून स्वयंपाक करविला. नंतर आम्हांला व इतर जे जेवायचे राहिले होते त्या सर्वांना बोलावून बाबासाहेबांनी जेवायला लावले. नंतर मग ते परिषदेच्या कामात गुंतले. कोठेही आणि केव्हाही बाबासाहेबांचे लक्ष लहान थोर कार्यकर्त्यांकडे असायचे. हा अत्यंत दुर्मिळ गुण बाबासाहेबांच्यात होता. पुढाऱ्यांच्या ठिकाणी असा गुण क्वचितच आढळतो.

डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून

No comments:

Post a Comment