Sunday, 23 December 2018

हवा पालटण्यासाठी म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पन्हाळ्यास एक महिना येऊन राहिले होते

हवा पालटण्यासाठी म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पन्हाळ्यास एक महिना येऊन राहिले होते.

        बाबासाहेब दररोज किंवा दिवसाआड कोल्हापूरास आपल्या मित्रांना भेटण्यास जात असत. श्री.दत्तोबा संतराम पवार व तुकाराम अप्पाजी गणेशाचार्य हे त्यांचे मित्र होते. या दोघांनाही दिवंगत शाहू महाराज यांनी सनदी वकिलाच्या सनदा दिलेल्या होत्या. न्यायाची दाद मागण्यासाठी वकिलांना भारी (खूप) फी द्यावी लागे. ते शक्य नसल्यामुळे अस्पृश्यांची कुचंबणा होत असे. म्हणून अन्यायाची दाद मागणे त्यांना सुलभ जावे या हेतूने शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजात चार-सहा इयत्ता शिकलेल्यांनाही वकिलीच्या सनदा दिलेल्या होत्या. दलितांवर अन्याय होऊ नये, उलट त्यांची सर्वांगीण सुधारणा व्हावी ही महाराजांची अंतरीची तळमळ होती. (आजच्या काळातील महाराजांची तळमळ याविषयी भाष्य न केलेलं बरं!) बाबासाहेबांचे स्नेही श्री.गणेशाचार्य यांनी मात्र सनद मिळाल्यापासून कोर्टात नियमितपणे हजर राहून आपली वकिली चांगल्या प्रकारे चालविली होती.

        बाबासाहेबांच्यावर या मित्रांची अढळ निष्ठा, प्रेम होते. बाबासाहेब सांगतील ते करण्याची त्यांची तयारी होती. बाबासाहेब शहरातून फिरत असता रस्त्यात जर शेंगा, मक्याची कणसे दिसली की बाबासाहेब आपली मोटार थांबवीत असत. मोटार थांबताच श्री.गणेशाचार्य तत्परतेने कणसे, शेंगावाल्यांकडे किंवा शेंगावालीकडे घाईने जात व आपल्या इस्त्रीचा शर्ट पुढे करुन त्यात शेंगा वगैरे घेत असत. भाजलेल्या शेंगाच्या राखेने त्यांचा शर्ट खराब होत असे. पण बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाने ते मोहून गेलेले असल्यामुळे त्यांच्यापुढे आपल्या कपड्याचीच नव्हे तर शरीराची देखील काही किंमत श्री.गणेशाचार्य यांना वाटत नसे. बाबासाहेबांच्या मित्रांनाही सर्वस्वाचा विसर पडावा इतके व्यक्तीमत्व महान होते. बाबासाहेब त्यांच्याशी वागताना अत्यंत सम-भावनेने वागत असत. कोणत्याही प्रकारचा अहंपणा ते बाळगीत नसत. अगदी बरोबरीच्या नात्याने ते त्यांच्याशी वागत असत.



डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून



सूचना:- कंसातील वाक्य वरील पुस्तकातील नाही.

No comments:

Post a Comment