Thursday, 3 January 2019

🌺 तयास मानव म्हणावे का? 🌺

🌺 तयास मानव म्हणावे का? 🌺

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेचि गोडी नाही
बुध्दी असूनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का? ॥१॥

दे रे हरी पंलगी काही
पशूही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का? ॥२॥

पोरे घरात कमी नाहीत
त्यांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का? ॥३॥

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का? ॥४॥

जोतिष रम सामुद्रिक हो
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का? ॥५॥

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का? ॥६॥

संसारी दारिद्रय राही
पांघरून तयावर नाही
निंदिती सगळे लोकही 
तयास मानव म्हणावे का? ॥७॥

लिहिणे वाचणेही नाही
उपदेश पटायचा नाही
पशूंना कळे ते न कळेही
तयास मानव म्हणावे का? ॥८॥

पशुत्वाची लज्जा नाही
त्यालाच मानीतो सुखही
पशुजीवाची लक्षणे ही
तयास मानव म्हणावे का? ॥९॥

दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सद्गुण नाही
तयास मानव म्हणावे का? ॥१०॥

गुलामगिरीचे दुःख नाही
जराही त्यास जाणवत नाही
माणुसकीही समजत नाही
तयास मानव म्हणावे का? ॥११॥

पशुपक्षी माकड माणूसही
जन्ममृत्यू सर्वांनाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का? ॥१२॥


सावित्रीबाई फुले
समग्र वाङमय

सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💐☺📚📖✍

No comments:

Post a Comment