Friday, 13 May 2016

"सैराटच्या तर्राट प्रतिक्रियांबद्दल.." --- ✍🏼संजय गगे खरीडकर

"सैराटच्या तर्राट प्रतिक्रियांबद्दल.."
                         ✍🏼संजय गगे खरीडकर
                           मु.पो.खरीड (ठाणे)
                               ७०८३९३७९६८

      काल "सैराट" पाहिला आणि मन सुन्न झालं.....
      चित्रपट पाहण्याअगोदरच अवघ्या "मानव जातीला" ( एकवेळ दगडाच्या काळजाची ठिक आहेत, पण प्रिंन्सच्या काळजाची माणसं सोडून ) विचार करायला लावणार्‍या "सैराट"मध्ये ना कुणाच्या अंगावर कमी कपडे, ना प्रेमाचा उघडा-नागडा रोमान्स, ना अश्लीलता, ना कुठली फालतुगिरी, प्रेक्षकांना उगाचंच खुश करावं म्हणून ना कुठल्याच सीनमध्ये अतिशयोक्ती..... अख्ख्या चित्रपटात पहायला मिळाला तो गावाकडचा बाज अस्सल गावरानपणा (गावढंळपणा नाही), ज्यात कुठेही खोटेपणाचा थोडासुद्धा लवलेश नाही.....
     नागराज मंजुळेंने अलगद अन् हळूवारपणे मांडल्या त्या "कुमारावस्थेतील प्रत्येकाच्याच भावना" अन् दाखवला विशिष्ट वर्गाचा मुजोरपणा.....
चित्रपटात कुठल्याही सीनवर आॅब्जेक्शन घ्यावा, असं काहीच नाही..... काहीच नाही.....
    नाही म्हणायला, अजूनही डोकं बधीर करुन ठेवलंय त्या चित्रपटाच्या तीस सेकंदांच्या शेवटानं,
"ना कुठला संवाद, ना कुठलं संगीत.....
फक्त पहायला मिळाली ती रक्तानं माखलेली निरागस पावले, जी जातीयतेच्या नावाने बळी पडली होती.....
विचार करुनही सांगता येत नाही की, "बळी पडलेल्या त्या निरागस पावलांची जात कोणती होती...?? आणि बळी घेणाऱ्या त्या जातीची व्यवस्था कोणती होती..???"
       मी चित्रपटाविषयी मांडलेल्या कुणाच्याही प्रतिक्रियेवर काही टिप्पणी देण्याअगोदरच या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून देऊ इच्छितो की "रिंकू जरी रियल लाईफमध्ये इयत्ता ९ वीत शिकत असली तरी चित्रपटात कथानकाच्या आवश्यकतेनुसार आर्ची, परशा अन् इतर पात्रे सिनियर काँलेजमध्ये F.Y. च्या वर्गात शिकत आहेत. की ज्या वयात कुणालाही प्रेम होणे स्वाभाविकच काय नैसर्गिक आहे. अन् महत्त्वाचं म्हणजे "चित्रपट हे संस्कारांचे घर नाही."
          आता किव कराविशी वाटते, ती चित्रपट न पाहताच अन् पाहूनदेखील "बाल-संस्काराच्या अन् समाजातील संस्कृतीच्या नावानं चित्रपटावर ताशेरे ओढणाऱ्यांची आणि त्यांची बुद्धीची..!!!"
    मला तर वाटतंय "अशा लोकांची एकतर "फँड्री अन सैराट"सारखे चित्रपट पाहण्याची लायकीच नाही" किंवा "देवानं यांना घडवतांना सैराटमधील "प्रिंन्सपेक्षा कठीण काळजाचं" बनवलं असणारं..!"
"काय तर म्हणे आई-बापानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आर्चीला पळून जाऊन प्रेम करायला शोभलं का..? सैराट पाहून म्हणे समाजातील मुलींनी असेच धंदे करावेत का..?? चित्रपटातून कोणते संस्कार घ्यावेत.??"
              नाही म्हणायला, प्रत्येक गोष्टीवर आपापलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. पण "कुणी जर प्रिंससारखं दगडाचं काळीज घेऊन समाजात वावरत असेल, तर त्यांनी मग स्वतःच्या कुमारावस्थेतील "परशा"ला  वाव देतांना एकदा नाही, तर हजारदा विचार करावा..... आणि ज्यांना चित्रपट पाहून आपल्या पोटी "आर्ची" जन्माला येण्याच्या भितीपोटी सैराटमधील काही खटकत असेल, तर त्यांनी आपलं स्वताचं काॅलेज जीवन तपासून पहावं..... अन् ज्यांच्या आयुष्यात काॅलेज जीवनच आले नसेल तर त्यांनी आपली स्वतःची कुमारावस्था तपासून पहावी..... की त्यावेळी आपल्या मनात कुणी आर्ची किंवा परशा तर डोकावत नव्हती..? किंवा त्यावेळी आपण कोणासाठी लंगडा अन् सलीम तर झालो नव्हतो??"
         सरतेशेवटी मी एवढंच म्हणेन की, सनी लियोन अन् शाहरुखसारख्या फडतूस कलाकारांचे फडतूस चित्रपट दाखवण्यापेक्षा आपल्या मुलांना "सैराट" दाखवा, एकतर "प्रिंसच्या भीतीपोटी आर्ची अन् परशा जन्माला येणार नाही" किंवा "रक्तात माखलेल्या निरागस पावलांना पाहून प्रिंस तरी जन्माला येणार नाही..!!!"

( लेखकदेखील एका मुलीचा बाप आहे. )
( संवेदना, ९१३०३३७९६८ )

No comments:

Post a Comment