Friday, 27 May 2016

अमावस्येला सूर्यग्रहण लागलेले जगाने अनेकदा पाहिले आहे. पण अमवस्या नसतानाही खग्रास सूर्यग्रहण...?

अमावस्येला सूर्यग्रहण लागलेले जगाने अनेकदा पाहिले आहे. पण अमवस्या नसतानाही खग्रास सूर्यग्रहण...? हो... एकदा लागले आहे ! जगाने अनुभवले आहे !! 27 मे, 1935...! 'साहेबा'ची 'रामू' गेली अन् दलित, पीडित, शोषित, सर्वहारा समाजाचे जग अंधारात बुडाले ! तळपत्या सूर्याच्या सावलीने या जगाचा कायमचा निरोप घेतला आणि साक्षात सूर्याला रडू कोसळले...! निरोप घेण्यापूर्वी साहेबांचा हात आपल्या थरथरत्या हातात घेऊन रमाबाई बाबासाहेबांना म्हणाल्या, "साहेब ! माझ्या सात कोटी लेकरांवर लक्ष ठेवा... त्यांची काळजी घ्या... त्यांना मान-सन्मान जरूर मिळऊन द्या..." बस... हेच अंतिम शब्द होते त्यागमूर्ती रमाबाईंचे ! कुवत नसताना ज्या माऊलीने शेवटच्या श्वासापर्यंत केवळ देण्याचे काम केले, ती आज आपल्याला काही मागत आहे , हे ऐकून पाषाणाला पाझर फुटला असता. ते तर रामूचे साहेब होते ! बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले. पण विचलित झाले नाहीत ! कारण तेथील सूर्याला या येथील सूर्यांने सांगून ठेवले होते...
तू तिथला
तर मी इथला सूर्य आहे
तू ता-यांना प्रकाशमान कर
मी सा-यांना प्रकाशमान करतो...!
आणि बाबासाहेब दिल्या शब्दाला जागले. रात्रीचे दिवस केले. अंधा-या वस्त्यांवर त्यांनी दिवे लावले ! या कामी खडतर काळात रमाबाईंची बाबासाहेबांना समर्थ साथ मिळाली नसती तर !... ही कल्पनाही करवत नाही. गणितामध्ये एक अधिक एक दोन होतात. ही साधी बेरीज ! पण इथे एक अधिक एक अकरा झाले !! यातच रमाईचे महात्म्य दडले आहे !!!
आज स्मृतिदिनानिमित्त आईला मनोभावे अभिवादन करताना कुणाचा कंठ दाटून येणार नाही ? येणारच !
बस... एकच करू या...
"इथे कुणाचेच काही कष्ट नाही
ही तुझीच कमाई आहे गं भीमाई"
ह्या दोन ओळी इमानदारीने काळजावर गोंदऊन घेऊ या...!
कोटी कोटी प्रणाम !!

No comments:

Post a Comment