Monday, 6 June 2016

आंबेडकरमय भारत!

आंबेडकरमय भारत!

भारतात आजघडीला भांडवली हुकूमशाही आहे हे कुणी अमान्य करणार नाही पण या भांडवली हुकूमशाहीचा पाया सांस्कृतिक ब्राम्हणशाही आहे हे विसरता कामा नये. उदारीकरणाने सर्व प्रश्न केवळ आर्थिक झालेत का? उलट उदारीकरणानंतर सामाजिक सांस्कृतिक प्रश्न आणखी चिघळलेत. जातीअंत म्हणजे केवळ आंतरजातीय विवाह समजणे साफ चुकीचे आहे. तो जातीअंताचा एक भाग होऊ शकतो पण  AoC मध्ये डॉ आंबेडकर हिंदू धर्मातील जातीप्रथेच्या मुळावर आघात करायला सांगतात आणि वीस वर्षे अभ्यासपूर्ण विचारांती बुद्ध धम्म स्वीकारतात. जाती अंताच्या परिषदा होतात एकदोन परिषदांना मीही गेलो आहे. ज्यात आंतरजातीय विवाहांचा आग्रह धरला जातो अत्याचारांना न्यायालयीन लढाईचा आग्रह धरला जातो. पण एवढ्याने जातीअंत होत नसतो. आंतरजातीय विवाहांना जातीजातीतले अंतर कमी नक्कीच होते, जे झाले पाहिजेच. पण जातीअंताला हिंदू धर्माचा त्याग हाच एकमेव आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद मिटवण्याचा मार्ग आहे. खाजगीत घरी मित्रमंडळीत सणवारात उत्सवांत सांस्कृतिक ब्राम्हणशाही इमानाने पाळत, गोविंदाला नाचत बाहेर सत्यशोधक स्टेजवरून बोलताना आम्हाला भांडवली हुकूमशाहीचा बागुलबुवा दाखवातात तर मग उपयोग काय?

सांस्कृतिक वर्चस्ववाद हा मुळाशी आहे आणि त्याला उत्तर बाबासाहेब धर्मांतराने देतात तर मग धर्मांतर हे अंतिम ध्येय असू शकते का? बाबासाहेब मी भारत बौद्धमय करेन म्हणतात, भारत बौद्धमय करणे आपले ध्येय आहे का? आहे तर आपण भारत कसा बौद्धमय करणार आहोत याची आपल्याकडे काही यंत्रणा आहे का? बर मग लोक विचारतात धर्मांतराने सर्व प्रश्न सुटलेत का? कुणी नाही म्हणेल कुणी हो म्हणेल. मी तर होच म्हणेल. मग मी भावनिक आहे का? धर्मांतराने आम्हाला पैसा अडका दागदागिने जमिनी नोकऱ्या मिळवून दिल्या नाहीत आणि या भौतिक सुखात आम्ही धर्मांतर मोजणारही नाही पण धर्मांतराने आम्हाला माणूस म्हणून ओळख दिली. डॉ आंबेडकरांनी धर्मांतर केले नसते तर तुमचे प्रश्न सुटले असते का? धर्मांतराने सर्व प्रश्न सुटावे असा आग्रह धरणारेही मला बालिश वाटतात. तुम्ही किती काही करा तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच लढावे लागते, कुठला धर्म तुमचे प्रश्न सोडवत नसतो. तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचा मार्ग दाखवत असतो. धर्मांतराने तुम्हाला काय दिलं? असा प्रश्न करणाऱ्यांना मी हेच उत्तर देतो की धर्मांतराने आम्हाला आमचे प्रश्न सोडवायचा मार्ग दिला. आणि त्यावर आम्ही स्वतःही चालतो आहोत आणि समप्रश्न असणाऱ्यांनाही सोबत घेतो आहोत. आज आमचे प्रश्न पूर्ण सुटलेले नसले तरी आमची सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि मानसिक वृद्धी ही आम्हाला काही कमी वाटत नाही. हिंदू धर्मात राहून आम्हाला ही हरप्रकारची वृद्धी साध्य करता आली असती काय? धर्मांतराने जाती मिटल्या का हा एक प्रश्न विचारला जातो. मी यालाही हो उत्तर देईन. पुन्हा मी भावनिक आहे का? हे पहा अडीचशे दशकांची गुलामी, रूढी परंपरा तुम्ही पाच दशकात मिटली पाहिजे असा आग्रह धराल तर अडीचशे दशकांच्या तुलनेत पाच दशकात झालेला बदल कमी आहे काय? आणि एकूण जातीअंत ही काय फक्त धर्मांतरीत बौद्धांचीच जबाबदारी आहे काय?

आज भारताच्या परिप्रेक्षात मी बोलणार नाही पण महाराष्ट्रात जेवढे सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनवादी लढे लढले जात आहेत त्यात ९०% बौद्ध समाज आहे. डॉ दाभोलकर डॉ पानसरे डॉ कलबुर्गी डॉ रोहिथ वेमूला आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल असेल किंवा कुठेही कुणावर झालेला कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार असेल त्यात सर्वप्रथम रस्त्यावर उतरणारा ९०% बौद्ध समाजच असतो. लोकं म्हणतात तुम्ही आमच्या प्रतिकांना धर्मरुढींना नावं ठेवता किंवा आणखी काही, पण ज्यांनी हा बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारलाय ते आज कितीतरी बौद्धेतर बुद्ध फुले शाहू आंबेडकरांशी मनाने जोडले गेलेले आहेत. आणि आज ओबीसी एस्सी एसटी मायनॉरिटी यांना फुले शाहू आंबेडकरी चळवळ सांगण्यात आणि सोबत घेण्यातही ९०% बौद्ध समाजच आहे. बौद्ध समाजाची स्वतःची एक राजकीय ताकदही आहे पण ती विखुरली गेली असल्याने ती कधी एकवटणारच नाही असे आपलेच मनोमन ठरवून का मोकळे व्हा? कुठल्याही राजकीय नेतृत्वाला कालमर्यादा असते. ही साधारण ४० ते ५० वर्षांची असते. ६० च्या दशकातील नेतृत्व २००० साली तसेच राहिले नाही. आज जे नेतृत्व आहे ते ८० च्या दशकात निर्माण झालेले आहे. त्यामुळे २०२० पासून पुढे आजच्या पिढीच्या तरुणांची भूमिका निर्णायक राहणार आहे. आणि आजची पिढी ही डॉ रोहिथ वेमूलाची पिढी आहे. ती शांत बसणारी नाही.

लोकं नेहमी विचारतात की भारत बौद्धमय करणार तर कसा करणार? भारत बौद्धमय करणार म्हणजे नेमका काय करणार? सर्वांना दीक्षा देणार का? काय करणार काय नेमके? तेव्हा आम्ही निरुत्तर असतो का? मुळीच नाही. भारत बौद्धमय करणे म्हणजे भारत आंबेडकरमय करणे. भारतातील प्रत्येक नागरिकाला आंबेडकर माहिती करून देणे. त्यांच्यापर्यंत आंबेडकरांचा हरेक पैलू पोहोचवणे. हे वाक्य मस्तिष्कात कोरून ठेवले पाहिजे, "भारत आंबेडकरमय झाला की भारत वेगळा बौद्धमय करायची आवश्यकता नाही."

आम्ही पंचवीशीतील तरुण आहोत. आम्हाला साठीतली माणसं भेटतात आणि आम्ही हे केले आम्ही ते केले तुम्ही काय केले विचारतात तेव्हा मला अजब वाटतं. आज आम्हाला जे जमतंय ते आम्ही करतोय. ज्याला जे जमतं त्याने ते द्यावे. कुणाला बुद्धी देता येते त्याने ती द्या, कुणाला पैसे देता येतील त्याने ते द्या, कुणाला वेळ देता येईल त्याने तो द्या, ज्याला तिन्ही देता येतय त्याने ते द्या. आज आमची मुलं शिक्षण, घर, नोकरी सांभाळून चळवळीत काम करत असतात. आमची बापजाद्यांची दौलत नाही, एकरात जमिनी नाहीत, आमचा संघर्ष आमच्या पाठीशी आहे पण आम्ही या लढाईत पाय रोवून उभे आहोत. तुम्ही काय काय केलेय याचा तुम्हालाच पाढा वाचावा लागत असेल तर तुम्ही काहीच केलं नाही असं समजा. आज धर्मांतरीत बौद्धांनी आपल्या पूर्वास्पृश्यतेचा पुरावा दिल्याशिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाहीये. म्हणजे ही व्यवस्था तुम्हाला पुन्हा चातुर्वर्ण्य स्वीकारा अथवा आरक्षण नाकारा असा इशारा देते आहे. आजवर इतरांच्या आरक्षणासाठी टाचा झिजवलेल्यांसोबत किती जातीअंताचा लढा उभारणारे उभे राहतात हे लक्षणीय ठरणार आहे. आरक्षण ही काही मदत किंवा भीक नाही आरक्षण ही संधीच्या समानतेसाठी केलेली तरतूद आहे. आरक्षण हा खूप मोठा विषय आहे. त्याच्या आजवरच्या अंमलबजावणीतील कमतरता मी अनेकदा वाचून दाखवली आहे. ८ लाख मुलं शिष्यवृत्ती पासून वंचित आहेत, सरकारी नोकऱ्यांत लाखोंचा बॅकलॉग आहे. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण झालेय आणि खाजगी नोकऱ्यांत सवर्णांना अघोषित आरक्षण आहे. शिष्यवृत्ती मध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार आहे. कुणी लढो वा न लढो त्यासाठी लढायला आमच्या आंबेडकरी पिढीने सज्ज राहिले पाहिजे.

प्रत्येक आंबेडकरी तरुणाने आंबेडकर वाचून समजून घेऊन एकमेकांना आणि भारतीयांना सांगितले पाहिजेत. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट हेच असले पाहिजे,

"मी भारत आंबेडकरमय करेन!"

जयभीम!

-- डॉ आशिष तांबे
मुंबई
०५.०६.१६

No comments:

Post a Comment