Wednesday, 22 June 2016

☀ शील, समाधी, प्रज्ञा.

☀ शील, समाधी, प्रज्ञा.

🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

🌞 शील 🌞

शील म्हणजे नितिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे व चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी न करणे म्हणजे शील. शील म्हणजे पापकर्म करण्यापासून दुर राहणे. ज्यांचे बोलणे, चालणे नितीला धरुन आहे, त्याला शीलवान म्हटले जाते. थोडक्यात शील म्हणजे माणसाच्या मनाची स्थिती ज्यामुळे मनुष्य पापकर्म, अकुशल कर्म करण्यापासून दूर राहतो. पुण्यकर्म, कुशल कर्म संपादीत करतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘शील व सौजन्य नसेल तर शिक्षित माणूस हिस्त्र पशुपेक्षाही क्रुर व भितीप्रद असतो.’ म्हणून चरीत्रहीन व्यक्ती कितीही शिकला तरीही तो पशुपेक्षाही महाभयंकर असतो. त्याच्या शिक्षणाला काहीही किंमत राहत नाही.
शील हे काचेसारखे असते. एकदा का त्याला तडा गेला की त्याला जोड़णे कठीण जाते. तसेच शीलाचे आहे. एकदा का कोणी शील गमावून बसले की त्याला पुन्हा इज्जत कमाविणे कठीण होऊन बसते.

अष्टांगिक मार्गातील सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे मार्ग शीलामध्ये येतात.

🌞 प्रज्ञा 🌞

 प्रज्ञा म्हणजे कुशल विचारांसहित आलेले पुर्ण ज्ञान की ज्यायोगे दु:ख आर्यसत्य, प्रतीत्यसमुत्पाद, आर्य अष्टांगिक मार्ग याचे यथार्थ ज्ञान होते. म्हणून सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प यांचा समावेश प्रज्ञेत केला जातो. वस्तुमात्र जसे आहेत तसे पाहणे, वस्तुमात्रांच्या वस्तुस्थिती संबंधीचा गोंधळ नष्ट करणे म्हणजेच प्रज्ञा. दु:ख नष्ट करण्यासाठी, निर्वाण प्राप्‍त करण्यासाठी किवा अर्हतपद मिळविण्यासाठी प्रज्ञा, शील व समाधी यातील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे प्रज्ञा आहे. सत्य व आर्यसत्य जाणणे, शोध घेणे, भ्रांतचित्त्त न होणे हे प्रज्ञेचे कार्य आहे. प्रज्ञेमुळे पुढील फयदे होतात.
१) शीलाचे महत्व कळते,
२) समाधीची अत्युच्च पायरी गाठता येते,
३) आर्य अष्टांगिक मार्गावर प्रगती करता येते,
४) विशुध्द जीवनाची फळे दिसू शकतात,
५) सर्व वस्तुमात्रांचे यथार्थ दर्शन होते,
६) पाखंडी मताचे यथार्थ ज्ञान होते व
७) लोभ, द्वेष व मोह याच्यापासून दुर राहता  येतात.

प्रज्ञेचे चिंतनमय, श्रुतमय व भावनामय असे तीन प्रकार आहेत. चिंतनावर आधारलेल्या प्रज्ञेला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात. जी दुसर्‍यांकडून शिकली जाते आणि जी पुस्तकी ज्ञानावर आधारलेली आहे तीला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात. सततच्या अभ्यासाने बौध्दिक विकासातून जी स्वयंस्फुर्त येते ती भावनामय प्रज्ञा.

            अष्टांगिक मार्गातील  सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे मार्ग प्रज्ञामध्ये य़ॆतात.

🌞 समाधी 🌞

समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. ज्याने सम्यक समाधी प्राप्‍त केली आहे तो ‘वस्तुमात्र जसे आहेत तसे’ पाहू शकतो. गोष्टी जसे आहेत तसे पाहणे याला बुध्द धम्मात फार महत्व आहे. गोष्टी जसे आहेत तसे सत्यस्वरुपात पाहिल्यानेच दु:ख, अनित्यता व अनात्मता ह्या तीन भगवान बुध्दाच्या महत्वाच्या सिध्दांताविषयीचा अनुभव येतो. हा अनुभव आणि ज्ञान होत असल्यानेच त्याला आपोआपच प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांताप्रमाणे दु:ख नष्ट होते.

माणसाचे  मन स्थिर नसते. ते सहा इन्द्रियविषयांत नेहमी रममाण झालेले असते. ‘वस्तुमात्र जसे आहेत तसे’ पाहण्यासाठी मन केंद्रित करावे लागते. अकुशल मनोवृतीचा पूर्ण निरोध करुन कुशल मनोवृतीचा विकास करणे ही बुध्द धम्माची शिकवण आहे. सम्यक समाधी साधण्यासाठी शील संपादन केले पाहिजे. शीलाशिवाय समाधीचा लाभ होत नाही.

अष्टांगिक मार्गातील सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे मार्ग समाधीमध्ये येतात.

🌸 एकदा एका गृहस्थाने शास्त्यांना ( बुद्धांना ) एक प्रश्न विचारला :-

शील जास्त महत्वाचे कि प्रज्ञा ?
पहिले प्रथम कोण महत्वाचे ?

🌞 तथागत म्हणतात :-

शील हे प्रथम प्राथमिक अंग आहे. ते समाधीला बलवान/निर्मळ बनवते. समाधी ही प्रज्ञेला बलवान/निर्मळ बनवते, प्रज्ञा ही निर्वाणासाठी उपयोगी आहे, जसे तीन पायांचे आसन.

गृहस्थ :- एखादे उदाहरण देऊन स्पष्ट करावे. 🙏

🌞 तथागत म्हणतात :-

जेव्हा एखाद्याचे दोन्ही हाथ घाणीने खराब झालेले असतात. तेव्हा ती व्यक्ती सुरुवातीला एक हाथ (शील) साफ करते. नंतर त्या पहील्या धुतलेल्या हातानेच दुसरा हाथ (प्रज्ञा) साफ करते.

      आता दोन्ही हाथ साफ झाल्यावर ती दोन्ही हाथ एकमेकांवर रगडून खुप व्यवस्थितपणे एक हाथ दुसऱ्या हाथाचे व दुसरा हाथ पहील्या हाथाचे कानेकोपरे अगदी स्वच्छ/निर्मळ करतात. हे दोन्ही हाथ एकमेकांचे पुरक ठरतात.

अगदी याच प्रमाणे हे गृहस्था, सुरुवातीचे माफक शील, प्रज्ञेला स्वच्छ बनवते. समाधी इथेही एकाग्रतेच्या स्वरुपात असते.

प्रज्ञा मिळाली कि शील आणखीन सहज व मनापासून होते. शील आणखीन पुष्ट झाले कि ( समाधी मुळे ) प्रज्ञा आणखीन स्वच्छ, खोल व गंभीर बनत जाते.

त्यामुळे "शील-समाधी-प्रज्ञा"  ही धम्माची परीपूर्ण व परीशुद्ध अंगे एकमेकांना बळ देतात व मदतच करतात. त्यामुळे त्यांच्या संगमा शिवाय धम्म व निर्वाण शक्य नाही.

जय भीम
नमो बुद्धाय.
   
    🔸बुद्ध धम्म अनुसरण संघ ®🔸

🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

No comments:

Post a Comment