Wednesday, 15 June 2016

मी अनेक ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या व्याख्यानासाठी जातो.

मी अनेक ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या व्याख्यानासाठी जातो. काही ठिकाणी सभेत विचारतो की, बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो कुणाकुणाच्या घरात आहेत हात वर करा. बहुतेक सर्वजन हात वर करतात. मग मी विचारतो कि बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक किंवा ग्रंथ कोणाकोणाच्या घरात आहेत ते हात वर करा. फार तर थोडे हात वर होतात. न थांबता मी विचारतो, बाबासाहेब आंबेडकरांचे एकतरी पुस्तक संपूर्णपणे ज्यांनी वाचले असेल अशांनी हात वर करा. संख्या आणखी कमी होते. माझ्या आजूबाजूला बसलेल्या व्यासपीठावरील नेत्यांकडे व संयोजकांकडे मी पाहतो त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसते. मुद्दा स्पष्ट होतो. प्रतिमांवर प्रेम करणे ठिक आहे. परंतु विचारांकडे दुर्लक्ष करणे घातक आहे.

आपण सर्वजन उत्सव प्रिय आहोत. आपल्याला मिरवणुका काढायला, गुलाल उधळायला, घोषणा द्यायला आवडते, नाचायला आवडते हे स्वभाविक आहे. उपयुक्त ही आहे. परंतु तेवढेच करून थांबणे बरोबर नाही. उत्सवाच्या गदारोळात विचारांची घुसमट होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. अशी दक्षता घेतली नाही तर 'बनेल' श्रीमंत आणि 'फसवणारे' आपणास गुलाल उधळायच्या कामात अडकवून ठेवतील आणि त्यांचे विचार पुढे रेटतील त्यांचे विचार हेच बहुजनांच्या पूजनिय व्यक्तींचे विचार आहेत असे सांगत सुटतील. आपणास आपल्या पूजनिय व्यक्तींचे विचार माहित नसतील तर मग आपण सहजच फसविले जाऊ. आपण फसवले जाऊ नये असे वाटत असेल तर आपल्या पूजनिय व्यक्तींच्या प्रतिमांबरोबरच त्यांच्या विचारांची ओळख व पारख आपणास पाहिजे.

विचार- कॉ.गोविंद पानसरे

No comments:

Post a Comment