Thursday, 23 June 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Wed, 4 Feb 2015 : Sheetal Deore


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ मध्ये महू (मध्यप्रदेश) येथे झाला. १९१३ ला ते जेव्हा बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले.परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली.भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी,  त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०)  आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६)  अशी वृत्तपत्रे  चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही.केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’,  ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला.उत्तम समाजसमीक्षक  असण्याबरोबरच स्वत: एक  वाङ् मय-समीक्षक असणार्‍या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राम्हण’, यशवंत टिपणीस यांच्या ‘दख्खनचा दिवा’ या नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बटर्‌रान्ड रसेल यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’, ‘महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेट्स अँड मायनॉरिटिज’, ‘भारतातील जाती’ या ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली.डॉ. आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा  होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले.डॉ.आंबेडकरांनी १९२७ ला महाडच्या (जि. रायगड)  चवदार तळयावर अस्पृश्यांनादेखील पाणी भरता यावे यासाठी सत्याग्रह केला. स्वत: डॉ.आंबेडकर जरी हिंदू देव देवतांना मानत नव्हते, तरीही त्यांनी १९३० ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला. कारण जर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला, तर त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्र्न सुटण्यास हातभार लागेल, असे त्यांचे मत होते. हे सत्याग्रह केवळ त्या तळ्यापुरते किंवा मंदिरापुरते मर्यादित नव्हते, तर तो लढा सन्मानाने  जगण्याच्या हक्कांसाठी होता. तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी होता.वर्णव्यवस्थेचे समर्थन करणार्‍या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे जाहीर दहनही केले. १९१७ ते १९३५ या काळात हिंदू धर्मात राहूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला.१९३५ मध्ये त्यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा येवला येथे केली. १९५६ मध्ये सुमारे पाच लाख अस्पृश्य बांधवांसह बौध्द धर्माची दीक्षा घेऊन डॉ. आंबेडकरांनी धर्म-परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली. (दिनांक १४ ऑक्टोबर, १९५६., नागपूर.).१९३० सालच्या गोलमेज परिषदेच्या वेळी  त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असा सल्ला दिला होता. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते. विभक्त मतदारसंघांच्या प्रश्नावरून जेव्हा महात्मा गांधींनी आमरण उपोषण सुरू केले, तेव्हा  डॉ.आंबेडकर यांच्यासमोर महात्मा गांधींचे प्राण महत्त्वाचे की आपल्या जातिबांधवांचे हित महत्त्वाचे असा प्रश्न उभा राहिला. शेवटी त्यांनी तडजोड स्वीकारून महात्मा गांधीजींना आमरण उपोषण मागे घ्यायला लावले व त्याच वेळी अस्पृश्यांसाठी वेगळया रीतीने राखीव मतदारसंघ निर्माण करून  आपल्या जातिबांधवांचे हितदेखील पाहिले (पुणे करार).जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचे ठरवले, तेव्हा सखोल अभ्यास व चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौध्द धर्म निवडला. धर्म परिवर्तनाच्या या कृतीतूनही त्यांचे देशप्रेम लक्षात येते.शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे १९४६ मध्ये सिध्दार्थ महाविद्यालयाची, तर औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी’  या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली. शिक्षणाबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही १९२४ मध्ये ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली.१९२७ ला सवर्णांच्या अन्याय व अत्याचारापासून पददलितांचे संरक्षण करावे या हेतूने शिस्तबध्द असे ‘समता सैनिक दल’ स्थापन केले. १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, तर १९४२ साली ‘अखिल भारतीय शेडयूल्ड कास्ट फे डरेशन’ ची स्थापना केली. पुढे अखिल भारतीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले होते, परंतु दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.१९४७ मध्ये डॉ.आंबेडकरांचा स्वतंत्र भारताचे कायदामंत्री म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला व त्याच वर्षी त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी व घटना समितीचे सभासद म्हणून निवड झाली.राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले.
🙏🏻🌷🙏🏻🌻🙏🏻💐🙏🏻🌼🙏🏻

No comments:

Post a Comment